पुणे - महाराष्ट्रामध्ये शेकडो लोककला आणि हजारो लोककलावंत आहेत. जे लोक कलावंत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची लोककला संस्कृती आणि परंपरा एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत नेत आहेत. लोककला केवळ एक कला नाही तर ती महाराष्ट्राची ओळख आहे. या लोककलांचा शास्त्रीय दृष्ट्या सखोल अभ्यास होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र लोककला विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषदेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप प्रसंगी अविनाश आवलगावकर बोलत होते. प्रसन्न पाटील , धनंजय खुडे, निलेश गद्रे आदी यावेळी उपस्थित होते
अविनाश आवलगावकर म्हणाले, लोककला आणि ही लोककला सादर करणारे लोककलावंत हा महाराष्ट्राचा ठेवा आहे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील हजारो लोककलावंतांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या लोककलावंतांना खऱ्या अर्थाने लोकाश्रया बरोबरच राजा श्रेयाची गरज आहे. समरसता लोककला संमेलना सारखी संमेलने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध भागांमध्ये दरवर्षी आयोजित करणे गरजेचे आहे, त्यामुळे भारताच्या विविध भागांमध्ये असलेल्या लोककलावंतांना व्यासपीठ मिळू शकेल आणि त्यांची कला जगासमोर येऊ शकेल.
शासनाने लोककलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रथमतः लोककलावंतांनी एकत्र येण्याची गरज आहे. लोक कलावंतांनी एकत्र येऊन एकमुखाने मागणी केल्यास ते शक्य आहे . लोककला हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे हा ठेवा पुढील पिढीपर्यंत जाण्यासाठी या लोककलांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मराठी भाषा विद्यापीठ ज्याप्रमाणे स्वतंत्रपणे स्थापन झाले त्याचप्रमाणे लोककलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यासाठी वेगळ्या लोककला विद्यापीठांची आवश्यकता आहे असेही अविनाश आवलगावकर यांनी यावेळी सांगितले.
समारोपापूर्वी झालेल्या कवी संमेलनामध्ये अशोक गुट्टे, चंद्रकांत गायकवाड , लक्ष्मण गायकवाड , प्राध्यापक वा. ना आंधळे , रानकवी तुकाराम धांडे , कुमार चव्हाण आधी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

Post a Comment