⚡ ब्रेकिंग News

श्रमिकांच्या कष्टाने कामगार नगरीचा विकास - महापौर रवी लांडगे.... मीरा शिंदे यांना “हिंद रत्न कामगार पुरस्कार” प्रदान

 

पिंपरी, पुणे (दि. २ सप्टेंबर २०२६) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” याप्रमाणे श्रमिकांच्या कष्टाने पिंपरी चिंचवड या औद्योगिक आणि कामगार नगरीचा विकास झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि त्यांची हिंद कामगार संघटना देशभर कार्यरत आहे. या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एका कामगाराला 'हिंद रत्न कामगार पुरस्कार' देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार प्रथमच एका परिचारिका महिलेला देण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे सर्व परिचारिकांचा सन्मान आणि इतरांना प्रेरणादायी आहे. यावर्षीच्या पुरस्कारार्थी या नूतन भोसरी रुग्णालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या परिचारिका मीरा शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी स्वाईन फ्लू आणि कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले त्यांची निवड सार्थ आहे असे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मीरा शिंदे यांना 'हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६' महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम आहे. यावेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ मोरे, हाफिज पठान, आनंदराव फडतरे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, उत्तम गायकवाड, सारिका भिंगे आणि कामगार बंधू, भगिनी उपस्थित होते.


डॉ. कैलास कदम यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली कामगार संघटना आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिंद कामगार संघटना इंटक संलग्न आहे. हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार हा पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते देत आहोत ते देखील एका कामगार संघटनेचे नेते आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. मीरा शिंदे यांनी आपली नोकरी व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत एकूण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २७ वर्ष रुग्णसेवा केली. त्यांचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना मीरा शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदेश इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास भाऊ कदम यांना मी शिंदे परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हितासाठी अहोरात्र काम करणाऱ्या हिंद कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देते. हिंद कामगार संघटनेने आज माझा जो गौरव केला आहे त्याचा मी आदरपूर्वक स्विकार करते. हा पुरस्कार मी सर्व परिचारिकांच्या आदर्श आणि आधुनिक परिचर्येच्या जन्मदात्री "लेडी विथ द लॅम्प" फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आणि कोरोना काळात रुग्णसेवा करीत असताना इन्फेक्शन होऊन मृत्यू पावलेल्या माझ्या सर्व परिचारिका भगिनी यांना समर्पित करते. हा पुरस्कार फक्त माझा नसून वैदयकीय क्षेत्रामध्ये अहोरात्र रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व परिचारिकांचा आहे असे मी मानते. तसेच यासाठी माझी निवड करणाऱ्या निवड समितीचे मी आभार मानते. सूत्र संचालन प्रा. गणेश गोरिले आणि आभार यशवंत सुपेकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...