⚡ ब्रेकिंग News

मुंबईत आमरण उपोषण; आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी महासंघाचा 'NCERT' ला खणखणीत इशारा

पुणे... मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि नकाशा पाठ्यपुस्तकात पुन्हा समाविष्ट करा, अन्यथा मुंबईत आमरण उपोषण; आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी महासंघाचा 'NCERT' ला खणखणीत इशारा

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) कडून शालेय अभ्यासक्रमात सातत्याने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, मराठा साम्राज्याचा इतिहास आणि नकाशा डावलल्याचा गंभीर आरोप करत 'आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी महासंघ' आता आक्रमक झाला आहे. या अन्यायाविरोधात महासंघाचे संस्थापक, विख्यात व्याख्याते आणि मराठा आंदोलक छत्रपती भूषण डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर, मुंबई येथे भव्य आमरण उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत या आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला इंद्रजित सिंह घोरपडे, अनिल निघोट आणि देवदत्त पोखरकर यांसारख्या मान्यवर नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी स्पष्ट केले की, ज्या साम्राज्याने अठराव्या शतकात अटकेपार झेंडे लावून खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचे रक्षण केले, त्या मराठा साम्राज्याचा नकाशा आणि इतिहास पाठ्यपुस्तकातून पुसून टाकणे हा केवळ इतिहासाचा विसर नसून येणाऱ्या पिढीची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महासंघाच्या महिला आघाडी (भारत) ज्येष्ठ नेत्या सौ. शिवशंभू प्रिया जांभळे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (विद्यार्थी आघाडी) संकेश काशिनाथ यशवंतराव हे करणार आहेत. बदलापूर येथे होणाऱ्या या आमरण उपोषणाद्वारे केंद्र सरकार आणि NCERT प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पहिली मागणी अशी की, NCERT ने आपल्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा आणि साम्राज्याची व्याप्ती दर्शवणारा मजकूर तातडीने पुन्हा समाविष्ट करावा. जर केंद्रीय स्तरावर या इतिहासाला न्याय देणे शक्य नसेल, तर मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र 'मराठा शिक्षण बोर्ड' स्थापन करण्यात यावे, जेणेकरून भविष्यातील पिढीला शिवरायांच्या आणि त्यानंतरच्या पराक्रमी सुभेदार-सरदारांच्या कार्याची योग्य माहिती मिळेल.

या पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. "मराठ्यांनी या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी रक्ताचे पाणी केले, मात्र आज कागदावरचा त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही," असा इशारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत शासन यावर लेखी आश्वासन किंवा ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत सौ. शिवशंभू प्रिया जांभळे आणि संकेश यशवंतराव हे बदलापूरच्या भूमीत अन्नत्याग करून उपोषणावर ठाम राहतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या आंदोलनाला राज्यातील विद्यार्थी संघटना, इतिहासप्रेमी आणि महिला भगिनींचा मोठा पाठिंबा लाभत असून, या प्रेस नोटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शिव-शंभू भक्तांना या आंदोलनाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रसिद्धीसाठी: कार्यालय, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी महासंघ

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...