इंदापूर : विशाल मोहिते/ सोलापूर जि .प्रतिनिधी.... नागपंचमी तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध पारंपरिक खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक खेळांमधून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीतील जुन्या खेळांची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी तसेच शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

स्पर्धांमध्ये पारंपरिक सुरपाट्या, तसेच गोळाफेक आणि लिंबू-चमचा यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत एकमेकांना कडवी टक्कर दिली. पारंपरिक खेळांमुळे महाविद्यालयाच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे व कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मनोगतातून सांगितले. शिक्षणासोबतच क्रीडा, संस्कृती व पारंपरिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा क्रीडा उपक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment