पुणे : “आयुष्यात कष्ट केल्याशिवाय संधी मिळत नाही. मिळालेली संधी साधण्यासाठी आपली क्षमता सिद्ध करणे आवश्यक आहे. जीवनातील संघर्ष आणि कष्टांना सामोरे जाताना कुटुंब आपल्या पाठीशी उभे असते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कला आत्मसात करा. समोरच्याला आदर देत देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा प्रयत्न करा,” असे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले. भविष्यात तरुणपिढीची भूमिका महत्वाची असून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण वास्तुरचनाकारांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
सतिश मिसाळ एज्युकेशनल फाऊंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा १३ वा स्थापना दिवस आणि पदवी प्रदान समारंभात माधुरी मिसाळ बोलत होत्या. उंड्री येथील महाविद्यालयात आयोजित समारंभावेळी नगरसेविका मानसी देशपांडे, ऑलकार्गो ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशीकिरण शेट्टी, अहमदाबाद येथील आर्किटेक्ट स्नेहल शाह, प्राचार्या डॉ. पूर्वा केसकर, उपप्राचार्य आर्कि. मनाली देशमुख, जयदीप चक्रवर्ती, मयुरेश शिरोळकर, स्वप्निल शेठ, व्हीके ग्रुपच्या संचालिका आर्कि. अपूर्वा कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. वैदेही लावंड, डॉ. श्रद्धा मांजरेकर, आर्कि. नलिनी नाईक निंबाळकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, "शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. या नव्या बदलांना समजून घेत विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्ये विकसित केली पाहिजेत. आपल्या कार्यातून भारताची जगभरातील प्रतिमा उंचावण्यासाठी योगदान द्यावे. तरुणांना योग्य दिशा दाखविण्याचे कामही आधीच्या पिढीने करावे. पदवी मिळणे हा एक टप्पा आहे. प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रात तुम्ही आता पदार्पण करीत असून, आपल्या स्वतःच्या प्रगतीसोबतच आई-वडिलांचे, आपल्या संस्थेचे व गुरुजनांचे नाव उंचावणारी कामगिरी करा. आजची पदवी हा प्रवासाचा शेवट नसून, एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. "
शशीकिरण शेट्टी म्हणाले, “शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे. केवळ पदवीपेक्षा शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात आणि उद्योगक्षेत्रात उपयोग करता येणे गरजेचे आहे. माझ्या प्रवासात आलेल्या विविध अनुभवांनी मला सातत्याने शिकण्याची आणि बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला घडविण्याची संधी दिली. आज तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक बदलांमुळे उद्योगक्षेत्र वेगाने बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या गरजा समजून घेत आपली कौशल्ये विकसित करावीत. महत्त्वाकांक्षेबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशाच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासात योगदान द्यावे."स्नेहल शाह यांनी वास्तुरचना क्षेत्रातील बदलत्या संधी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "वास्तुरचना क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्य आणि कौशल्य यांची सांगड घालावी. वास्तुरचनाकार म्हणून केवळ उत्तम डिझाइन करणे पुरेसे नसून, समाजाच्या गरजा, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा विचार करून काम करण्याची गरज असते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे वास्तुरचना क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असून, विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची तयारी ठेवावी."
प्रास्ताविकात डॉ. पूर्वा केसकर यांनी गेल्या तेरा वर्षात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. 'इंडियाज मोस्ट प्रेफरर्ड आर्किटेक्चर इन्स्टिट्यूशन्स' क्रमवारीत देशातील ३३२ महाविद्यालयात 'ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'ला सातवे, तर खासगी महाविद्यालयातून दुसरे स्थान मिळाले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आले असले, तरी वास्तुरचनाकारांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 'एआय'च्या मदतीने आपल्या डिझाईन्स अधिक कल्पक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने साकारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.रसिका आपटे व वीरा भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. आर्कि. नलिनी नाईक निंबाळकर यांनी आभार मानले.





Post a Comment