⚡ ब्रेकिंग News

गरुडझेप मोहीम २०२६ आग्रा ते राजगड हिंदवी स्वराज्याचा एक शिवस्मरण मार्ग...

 

१७ ऑगस्ट १६६६ – शिवचातुर्य दिन एक स्मरण म्हणून पाळला जातोय आणि तो पिढ्यानपिढ्या पाळला गेलाच पाहिजे..‌. त्यासाठी एक ध्येयवादी तरुण सह्याद्रीचा मावळा आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे पायदळाचा पहिला सरसेनापती पिलाजीराव गोळे यांचा १४ वा वंशज मारुती गोळे खऱ्या अर्थाने प्रयत्नशील आहे आणि एका जिद्दीने झटत आहे..आग्रा ते राजगड १,३१० किलोमीटरचा पायी व सायकल प्रवास... चार राज्यांतून सलग अकरा दिवसांची घोडदौड... आणि शेकडो शिवप्रेमी मावळ्यांचा  आत्मियतेनं यात सहभाग !

सह्याद्रीच्या कुशीत, मावळच्या मातीत घडलेल्या पिरंगुटच्या सुपुत्र दुर्गवीर अॅड. मारुतीआबा गोळे यांनी पेटविलेली शिवप्रेरणेची ही मशाल आज तेजाने तळपताना दिसत आहे. त्यांच्याच  संकल्पनेतून साकारलेली “गरुडझेप मोहीम – आग्रा ते राजगड” यंदा आपल्या सातव्या पर्वात प्रवेश करत आहे.

मुघल साम्राज्याची बलाढ्य राजधानी असलेल्या आग्र्यात औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. परंतु त्या जिवघेण्या संकटासमोर खचून न जाता त्यांनी आपल्या असामान्य बुद्धिचातुर्याने, धैर्याने, संयमाने आणि अचूक नियोजनाने त्या परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढला. 

१७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्र्यातून झालेली महाराजांची सुटका ही केवळ इतिहासातील एक घटना नाही तर ती संकटावर मात करण्याची, अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही मार्ग शोधण्याची आणि स्वराज्याच्या ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावण्याची प्रेरणादायी अशी गाथाच आहे. त्याच ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण ठेवून १७ ऑगस्ट हा “शिवचातुर्य दिन” म्हणून साजरा करताना “गरुडझेप मोहीम” केवळ एक पायी-सायकल प्रवास राहत नाही. हा प्रवास आहे शिवविचारांचा, इतिहासाचा, साहसाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा. शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका केली ती केवळ स्वतःच्या जीवासाठी नव्हे, तर स्वराज्याचे मोठे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली आणि समोर येऊन ठेपलेलं संकट कितीही मोठे असले तरी जर आपलं ध्येय स्पष्ट असेल आणि आपण आपल्या बुद्धीचा योग्यप्रकारे वापर केला आणि धैर्याने निर्णय घेतला तर अशक्य वाटणारेही शक्य होते, हाच तो संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.

आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ वाचण्यापेक्षा तो जगण्याची प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांची गरज आहे. “ गरुडझेप मोहीम ” त्याच दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल आहे. तब्बल १,३१० किलोमीटरचे अंतर पायी आणि सायकलवरून पार करताना सहभागी तरुणांना शारीरिक कष्ट, शिस्त, संयम, संघभावना आणि ध्येयासाठी सातत्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या आदरणीय मारुती आबांच्या या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शिवचरित्राचा संदेश गावोगावी पोहोचवणे. आग्रा ते राजगड हा प्रवास म्हणजे इतिहासातील एका महान प्रसंगाला वर्तमानाशी जोडणारा शिवस्मरण मार्ग आहे. प्रत्येक टप्प्यावर तरुणांना महाराजांच्या विचारांची,पराक्रमाची आणि स्वराज्यनिष्ठेची ओळख होते.

याच प्रेरणादायी अशा अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज शुक्रवारी, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा स्मारकापासुन  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ध्वज दाखवून मोहिमेला सुरुवात झाली आणि शेकडो सायकलस्वार आग्र्याच्या दिशेने रवाना झाले. यावेळी सहभागी सायकलस्वार आणि धावपटूंना शुभेच्छा देण्यासाठी राजे शिवराय प्रतिष्ठान आणि गरूडझेप म़हिमेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगडाचे अभ्यासक व इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, नगरसेविका तेजश्रीताई महेश पवळे, मनिषाताई बुटाला, वासंतीताई जाधव, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे, तसेच गरुडझेप मोहिमेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि असंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. मारुतीआबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोहीम आज शेकडो तरुण मावळ्यांना जोडत आहे. हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. आग्रा ते राजगडचा हा प्रवास केवळ १,३१० किलोमीटरचा नाही; तो इतिहासापासून वर्तमानाकडे आणि वर्तमानातून भविष्याकडे जाणारा प्रेरणेचा प्रवास आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करताना दाखविलेले चातुर्य आजच्या तरुणांना सांगते संकट आले म्हणून थांबायचे नाही, परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून हार मानायची नाही आणि ध्येय मोठे असेल तर त्यासाठी धैर्याने वाटचाल करायची. शिवरायांचे स्वराज्य हे केवळ भूतकाळातील वैभव नाही; ते कर्तव्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, शिस्त, धैर्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आहे. म्हणूनच “गरुडझेप मोहीम” ही नव्या पिढीच्या मनात शिवविचारांची ज्योत पेटवणारी आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारी प्रेरणादायी चळवळ ठरत आहे.  

आग्र्यापासून राजगडापर्यंत निघालेली ही गरुडझेप इतिहासाची पुनरावृत्ती नाही तर ती छत्रपती शिवरायांच्या विचारांना वर्तमानात जगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवचरित्राचा संदेश घेऊन, स्वराज्याच्या प्रेरणेची मशाल हातात घेऊन ही गरुडझेप राजगडाच्या दिशेने अशीच यशस्वीपणे झेपावत राहो हीच‌ शुभकामना !!


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...