विशाल मोहिते | सोलापूर जिल्हा प्रतिनिधी : निमगाव केतकी(ता . इंदापूर, पुणे) येथील ग्रामीण रुग्णालय अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि सर्व आवश्यक आरोग्य सुविधांनी परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली तुषार जाधव यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासह विविध आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली.
निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्यानंतर सौ. सोनाली जाधव यांनी आपल्या गटातील विविध गावांमधील मूलभूत प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाच्या विस्ताराचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे किंवा जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागू नये, स्थानिक पातळीवरच अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालयात आवश्यक सुविधा वाढविणे, जागेचा विस्तार, वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर सोनाली जाधव यांनी निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे. गावोगावी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद स्तरावरून निधी उपलब्ध करून घेऊन प्रत्यक्ष विकासकामे मार्गी लावण्यावर त्यांचा भर असल्याची चर्चा गटामध्ये सुरू आहे. आरोग्य, पाणी, रस्ते, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.
युवा नेते तुषार जाधव यांची खंबीर साथ.. सौ.सोनाली जाधव यांच्या या सामाजिक आणि विकासाभिमुख वाटचालीत त्यांचे पती तुषार जाधव यांची साथ महत्त्वाची ठरत आहे. श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्था निमगाव केतकीचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणून काम केलेले तुषार जाधव हे इंदापूर तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून पत्नीच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ते खंबीरपणे सोबत असल्याचे दिसून येते. जाधव कुटुंबाला राजकीय आणि सामाजिक कार्याची परंपरा लाभली आहे. यापूर्वी अंकुश जाधव आणि देवराज जाधव यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे जाधव कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीकडून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात होत असलेल्या कामाकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाचे पाठबळ
जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली जाधव आणि तुषार जाधव यांच्या विकासकामांना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे सांगितले जाते. गटातील विकासकामांसाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय पातळीवरील पाठपुराव्यासाठी भरणे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने विविध कामांना गती मिळत असल्याची चर्चा आहे. निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार हा या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा मिळावी, यासाठी रुग्णालय अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याचा थेट फायदा निमगाव केतकीसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना होणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी पुढाकार; नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या निवडणुकीनंतर विकासकामांना प्राधान्य देत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोनाली जाधव यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांना तुषार जाधव यांची मिळणारी साथ यामुळे निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटात त्यांच्या कामाची चर्चा सुरू आहे. आता ग्रामीण रुग्णालयाच्या विस्ताराच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही ठोस काम उभे राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग आणि शासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असतो.

Post a Comment